महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा विकास व्हावा या दृष्टीने तालुका पातळीवर प्राथमिक शेती सहकारी संस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व राज्य पातळीवर राज्य सहकारी बँकेची स्थापना झाली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना दिनांक ४ सप्टेंबर, १९१७ साली झाली. बँकेचे सुरुवातीचे अध्यक्ष मा. न. चिं. केळकर होते. तदनंतर मा. डॉ. धनंजयराव गाडगीळ, मा. एन. बी. भोपटकर, मा. प्रो. व्ही. जी. काळे आदी मान्यवरानी बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सद्यस्थितीत बँक मा. ना. अजित पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. ना. दिलीपराव वळसे पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. त्यांनी बँकेच्या कामकाजात सुधारणा करणेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून बँकेची आधुनिकीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने बँकेने कोअर बँकिंग प्रणाली अवलंबली आहे.

बँकेचे कार्यक्षेत्र हे पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, व्यापारी, खाजगी, अर्बन बँका मोठय़ा प्रमाणावर असून जिल्हा बँकेला या बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपले स्थान बळकट करावे लागते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यादृष्टीने प्रयत्नशिल असून गेली ९३ वर्षे बँकिंग व्यवसाय करीत आहे.

अर्बन बँका, सहकारी संस्था त्यांच्याकडील रिझर्व्ह फंडाची व एस. एल. आर. ची गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करतात. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही अर्बन बँकांना क्लिअरिंग सबमेंबरशिप दिलेली आहे. त्या बँकांचे क्लिअरिंगचे व्यवहार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत केले जातात. वेळप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अर्बन बँका व सहकारी संस्था यांना पतपुरवठा करतात म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिह्यातील मध्यवर्ती पतपुरवठा करणारी यंत्रणा असेही म्हणतात.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्रामुख्याने शेती व शेतीपूरक कारणासाठी कर्ज देते. बँकेबरोबरच सहकारी संस्थांचा विकास व्हावा या हेतूने सभासदांना थेट शेती कर्ज न देता सहकारी संस्थांमार्फत सभासदांना अल्पमुदत व दिर्घमुदत शेती कर्ज दिले जाते. सभासदास मध्यम मुदत शेती कर्ज सहकारी संस्थेकडून अगर बँकेकडून घेता येते. शेती क्षेत्राची व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची उन्नती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका महत्वपूर्ण भूमिका बजावतात.

उद्दीष्टे
बँकेची उद्दीष्टे पुढीलप्रमाणे आहेत

  • जिल्ह्यातील प्राथमिक सोसायटय़ांसाठी वित्तपुरवठय़ाचे संतुलन राखणारे केंद्र म्हणून काम करणे, त्यासाठी अशा सोसायटय़ांकडे निधीचा तुटवडा असेल तेव्हा तो पुरवणे आणि त्यांच्याकडे अतिरिक्त निधी असेल तेव्हा त्यासाठी योग्य ती कार्यवाही करणारे केंद्र (समाशोधन गृह) म्हणून काम पाहणे.
  • संलग्न सोसायटय़ांना भांडवल पुरवणे आणि बँकिंग व्यवसाय करणे.
  • प्राथमिक सोसायटय़ांचे राखीव निधी गुंतवण्यासाठी सुरक्षित जागा पुरवणे.
  • सदस्यांना अद्ययावत बँकिंग सुविधा पुरवणे.
  • ग्रामीण आणि शहरी भागात बँकिंग सुविधा विकसित करणे आणि देणे.
  • भक्कम पाया उभारून जिल्ह्यात सहकारी चळवळ विकसित करणे आणि मित्र, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ म्हणून काम करणे.
  • सदस्य सोसायटय़ांच्या कामकाजाचे निरिक्षण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.

सदस्यत्त्व

बँकेची घटना संमिश्र स्वरूपाची असून या घटनेत सदस्य म्हणून व्यक्ती आणि सहकारी सोसायटय़ा अशा दोहोंचा समावेश आहे. तरीसुद्धा सहकार खात्याच्या सल्ल्याप्रमाणे बँकेने वैयक्तिक सदस्यत्त्व ही संकल्पना आता वर्ज्य मानली आहे. ३१/३/२०१० प्रमाणे बँकेशी संलग्न असलेली सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे आहे

सहकारी सोसायटय़ा -    ९१४३
व्यक्ती -    २५२७
  एकूण     - ११६७०