पुनर्गुंतवणूक ठेव खात्याचे नियम
१) भारतीय करार कायदा १८७२ मधील तरतुदीनुसार करार करण्यास पात्र असणार्या कोणाही व्यक्तिस पुनर्गुंतवणूक ठेव खाते सुरू करता येईल. ज्या व्यक्तींस पुनर्गुंतवणूक ठेव खाते उघडावयाचे आहे त्याने बँकेच्या पुनर्गुंतवणूक खात्याचे नियम मान्य असल्याचे लेखी दिले पाहिजे. अर्जदाराने अर्जामध्ये संपूर्ण माहिती स्पष्ट व सुवाच्य लिहावी. त्याचप्रमाणे अर्जासोबत राहणेच्या जागेचा पुरावा तसेच ओळखीचा पुरावा याची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वत:चे पासपोर्ट साईजचे
२ ( दोन ) फोटो दिले पाहिजेत. त्याचप्रमाणे पॅन कार्डची झेरॉक्स प्रत दाखल केली
पाहिजे. पॅन कार्ड नसेल तर ६० / ६१ फॉर्म २ प्रतीत दाखल केला पाहिजे. ज्या खातेदाराचे बँकेत बचत / चालू ठेव खाते असेल त्यांना फोटो बाबत व राहणेच्या जागेच्या तसेच ओळखीच्या पुराव्याबाबत सवलत असेल. खाते उघडण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्जासह संबंधित व्यक्तिंने बँकेत हजर राहिले पाहिजे.
२) दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या नावे खाते उघडता येईल. एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यासंबंधीच्या पत्रव्यवहाराबाबत खास व्यवस्था केली नसल्यास प्रथम नाव धारण करणार्याबरोबर पत्रव्यवहार केला जाईल.
- दोघांचे अगर दोघांपेक्षा अधिकांचे नावाने संयुक्त खाते ( Joint Account )
या खात्यावरील व्यवहार दोघांचे अगर दोघापेक्षा अधिक व्यक्ती असल्यास सर्वाच्या सहीने करता येईल. या संयुक्त खातेदारांपैकी एखादा खातेदार मयत झाल्यास बाकीचे खातेदारांना मयत खातेदाराच्या वारसांच्या संमतीशिवाय रक्कम आदा केली जाणार नाही
- दोघांपैकी एक अगर हयात राहील त्याचे खाते ( Either or Survivor )
या खात्यातील रक्कम दोघांचे नावावर राहील. हे खाते दोघापैकी कोणाही एकाचे सहीने चालविता येईल. दोघापैकी एखादा खातेदार मयत झाल्यास खात्यातील रक्कम हयात खातेदारास मिळेल.
३) अ) सही न करता येणार्या व्यक्तींचे खाते
ज्या व्यक्तींस सही करता येत नाही. अशा व्यक्तींस बँके त समक्ष हजर राहून बँक अधिकार्याच्या समक्ष सहीऐवजी ( पुरूषांचा डाव्या हाताचा अंगठा तर स्त्रियांचा उजव्या हाताचा अंगठा ) स्वत:ची सही निशाणी अंगठा करून ओळखीदाखल अन्य बँक खातेदारांची ओळख देवून खाते सुरू करता येईल.
ब) अंध व्यक्तींचे खाते
सज्ञान अंध व्यक्तींस पुनर्गुंतवणूक ठेव खाते उघडता येईल. मात्र नेहमीच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. तसेच खालील बाबींची पूर्तता करावी लागेल.
- खाते उघडण्यासाठी अंध व्यक्तींने ओळख घालणार्या खातेदारासमवेत बँकेत समक्ष हजर राहिले पाहिजे.
- अंध व्यक्तींस स्वत:च्या नावाने स्वतंत्र किंवा त्याच्या विश्वासपात्र अन्य व्यक्तीसमवेत संयुक्त खाते उघडता येईल.
- अंध व्यक्तींस ठेव खाते सुरू करताना सर्व नियम व अटी शाखा व्यवस्थापक यांनी बँकेचे खातेदाराचे उपस्थितीत वाचून व समजावून सांगितल्या पाहिजेत व साक्षीदार म्हणून त्या खातेदारांची सही खाते उघडण्याच्या अर्जावर घेतली जाईल.
४) अज्ञानाचे खाते
अज्ञान व्यक्तिकरिता त्याचे नैसर्गिक पालनकर्ता म्हणून वडील किंवा आई अगर न्यायालयाने नेमलेला पालनकर्ता यांना अज्ञानाचे नावाने पुनर्गुंतवणूक ठेव खाते उघडता येईल. अशा बाबतीत अज्ञानाच्या जन्म तारखेचा अधिकृत दाखला खाते सुरू करण्याचे वेळी बँकेस दिला पाहिजे. मात्र दोन अज्ञान व्यक्तींचे नावावर एकच संयुक्त खाते सुरू करता येणार नाही. अज्ञान व्यक्ती सज्ञान होईपर्यंत पालनकर्त्यांस अज्ञानाचे वतीने देव घेवीचे व्यवहार करता येतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी पालनकर्त्यांवर राहील. मात्र ज्या दिवशी अज्ञान व्यक्ती सज्ञान होईल त्या दिवशी पालनकर्त्यांचा खाते चालविण्याचा अधिकार संपुष्टात येईल. अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर अन्य खातेदाराची ओळख घेऊन सज्ञान व्यक्तींचे स्वतंत्र खाते सुरू करण्यात येईल व अज्ञान व्यक्तींच्या खात्यातील रक्कम सज्ञान व्यक्तींचे खात्यावर वर्ग करून सज्ञान व्यक्तींचे स्वत:चे सहीने खात्यातील व्यवहार केले जातील.
५) सहकारी व अन्य संस्थांचे खाते
सहकारी व अन्य प्रस्थापित कायद्यान्वये नोंदलेल्या व स्थापन झालेल्या संस्था यांना संस्थेच्या नावाने पुनर्गुंतवणूक ठेव खाते उघडता येईल.
६) पुनर्गुंतवणूक ठेव खाते सुरू करणार्या व्यक्तींस त्यांनी भरलेल्या रकमेची पावती दिली जाईल. सदर पावतीमध्ये भरलेली रक्कम, रक्कम भरलेचा दिनांक, रक्कम परत करणेचा दिनांक, व्याजदर, मुदतीनंतर मिळणारी रक्कम इ. तपशिल असेल. सदरची पावती अहस्तांतरणीय असेल. जर एखाद्या खातेदाराची पावती गहाळ झाली तर अशा खातेदाराने बॅंकेच्या धोरणानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर डुप्लीकेट पावतीबद्दल योग्य त्या रकमेचा भरणा करून घेऊन त्यांना डुप्लीकेट पावती दिली जाईल.
७) पुनर्गुंतवणूक ठेव खात्यात कमीत कमी रु. १०००/- व
पुढे रु. १००/- चे पटीत कितीही रक्कम भरली जाईल.
८) मुदत संपलेल्या पुनर्गुंतवणूक ठेवीचे संपूर्ण अथवा
अंशत: रकमेसाठी नूतनीकरण करता येईल. तसेच ठेवीच्या देय रकमेपैकी कितीही रकमेचे
नूतनीकरण करता येईल. नूतनीकरण करावयाच्या ठेवीची रक्कम रु.१००/- च्या पटीत असावी असे बंधन नाही.
९) खातेदारास या ठेवीचे खाते किमान १२ महिने मुदतीने किंवा त्यापुढे
३ महिन्यांच्या पटीत कमाल १२० महिन्यांपर्यंतच्या कोणत्याही मुदतीने सुरू करता येईल.
१०) मुदतीपूर्वी खातेदारास खाते बंद करावयाचे असल्यास त्याने बँकेस
१५ दिवसांची आगाऊ नोटीस दिली पाहिजे. अशावेळी रक्कम परत करताना बँकेचे वेळोवेळी मुदतीपूर्वी ठेव परत करण्यासंबंधीचे धोरणानुसार रक्कम परत करण्यात येईल.
११) खातेदारांना असे ठेव खाते या बँकेच्या एका शाखेतून दुसर्या शाखेत वर्ग करता येईल.
१२) खातेदारास ठेवीची मुदत संपण्यापूर्वी मृत्यू आल्यास संमत धोरणानुसार नियुक्त / अधिकृत वारसास रक्कम परत केली जाईल.
१३) पुनर्गुंतवणूक ठेवीच्या तारणावर बँकेकडून वेळोवेळी ठरविण्यात येणार्या धोरणानुसार ओव्हरड्राफ्ट मंजूर करण्यात येईल. सदर ओव्हरड्राफ्टची मुदत ठेवीची मुदत संपण्याच्या दिनांकाअखेर राहील.
१४) पुनर्गुंतवणूक ठेवीवरील व्याजाचे दर हे बँकेकडून वेळोवेळी मुदत ठेवीचे जे दर ठरविण्यात येतील त्यानुसार राहतील.
१५) ही बँक फक्त बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० अन्वये रजिस्टर्ड झालेले ट्रस्ट मान्य करते.
१६) विशिष्ट कायद्याखाली नोंदवलेल्या संस्थेचे बाबतीत त्या संस्थेच्या नावाने अगर विशिष्ट अंमलदारास आपल्या हुद्दयाचे या बँकेत खाते सुरू करता येईल. मात्र सदर खाते सुरू करण्यास अगर त्या खात्यातील रकमांची देवघेव करण्यास त्या संस्थेस अगर त्या अंमलदारास सदर संस्थेच्या नियमाप्रमाणे परवानगी आहे किंवा कसे हे पाहण्याची जबाबदारी या बँकेवर राहणार नाही.
१७) एखाद्या इसमाने आपल्या नावापुढे एखाद्या बिगर नोंदलेल्या संस्थेच्या अंमलदाराचा हुद्दा लावून खाते सुरू केले असेल तरीही हे खाते त्या इसमाचे व्यक्तिंश: असून सदर हुद्दा त्याचे वर्णन आहे असे समजण्याचा बँकेस अधिकार राहील.
१८) कोणतीही आगाऊ सुचना न देता वरील नियमात बदल करण्याचे, कमी करण्याचे अगर जास्त नियम घालण्याचे सर्व हक्क बॅंकेच्या मा. संचालक मंडळाने राखून ठेवलेले आहेत. |